आता प्रत्येक ग्रामपंचायतींचा जमा-खर्च जगाला कळणार, ‘वेबसाइट’ होणार विकसित
आता प्रत्येक ग्रामपंचायतीची वेबसाइट नव्याने विकसित होणार असून, या माध्यमातून त्या गावचा इतिहास आणि जमाखर्चही जगजाहीर होणार आहे.
आतापर्यंत सूचना दिल्यानंतरही अनेक ग्रामपंचायतींनी वेबसाइट विकसित करण्याकडे दुर्लक्ष केले होते. परंतु आता ग्रामविकास विभागाने ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना’च्या पार्श्वभूमीवर या वेबसाइट कशा पद्धतीने विकसित करावयाच्या आहेत, याच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात या अभियानाला १७
अव्वल सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, ३१ डिसेंबरपर्यंत ते चालणार आहे. यासाठी येणाऱ्या ग्रामपंचायतींना तब्बल २४५ कोटी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि प्रधान सचिव यांनी याबाबत सविस्तर सूचना केल्या आहेत.
गावचा इतिहास समजणार
या वेबसाइटवर गावचा इतिहास, गावातील पर्यटन स्थळे, मंदिरे, गावची वैशिष्ट्ये, लोककला आणि संगीत परंपरा, स्वातंत्र्यसैनिक, कलाकार, शिक्षक यांसह प्रमुख मान्यवर, गौरवशाली व्यक्तींची माहिती तसेच गावातील उत्पादनांची सविस्तर माहिती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
१३ घटकांची माहिती
या वेबसाइटवर मुख्य पृष्ठ, ग्रामपंचायतीबद्दल माहिती, प्रमुख प्रकल्प आणि उपक्रम, योजना आणि लाभार्थी माहिती, घोषणा आणि परिपत्रके, ग्राम पायाभूत सुविधा, अर्थसंकल्प आणि पारदर्शकता, नागरिक सेवा आणि फॉर्म्स, आमचे गाव, ओळख आणि संस्कृती, रोजगार आणि कौशल्य विकास, शिक्षण आणि युवक कोपरा, तक्रार निवारण आणि फीडबॅक, पर्यावरण आणि शाश्वत विकास, अशा १३ घटकांबद्दल माहिती असेल.
“ग्रामविकास विभागाकडून वेबसाइट विकसित करण्यासाठी सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार अधिकाधिक माहिती देणाऱ्या, प्रभावी वेबसाइट निर्मिती करण्याबाबत ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत.”
जयवंत उगले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (ग्रामपंचायत) जि.प. कोल्हापूर